*आता तरी जुन्या परंपरा सोडून द्या*
*भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान |*
*भून्कोनी कुत्रा जप करी |*
*तुका म्हणे स्नान केले मळमुत्रे |*
*जेवविली पितरे अमंगळे ||*
*- संत तुकाराम*
पितृपक्षात आवर्जून पित्रे जेवू घालण्याची प्रथा आहे. जिवंत माणसाची जितकी काळजी घेतली जात नाही , तितकी मृत व्यक्तीची काळजी घेतली जाते. आश्चर्य आहे !!!
तिसरं , तेरावं , वर्षश्राद्ध अगदी न चुकता करणार. जिवंत आईबापाची हेळसांड करायची आणि त्यांच्या मरणानंतरचे सर्व क्रियाकर्म त्यांच्या अतृप्त आत्म्याला शांत करण्यासाठी करायचे. मेलेल्या माणसाचे भय !!! जिवंत माणसाच्या आत्म्याला क्लेश देताना मात्र भय नसते. कमाल आहे नाही...?
वर्तमानपेपरमध्ये बातमी वाचण्यात आली जन्मदात्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलाने नकार दिला आणि भ्रमणध्वनी बंद करून ठेवला.
भुकेने व्याकुळ अवस्थेत पडले होते. रोटी कापड बॅंकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फळे व जेवण देऊन रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जरी काही मतभेद असले तरी जन्मदात्याचे अन्नासाठी हाल होणे आणि मृत्यूनंतरही थोडासुद्धा मायेचा पाझर फुटू नये, यासारखी असंवेदनीय गोष्ट कोणती नसेल. जन्मदात्यांसाठी यासारखे काय ते दुसरे दुर्दैव असावे !
हाच कुपुत्र वडिलांचे श्रद्धा घालेल , पित्रे जेवू घालेल आणि पापातून मुक्त होण्याचा तोडगा काढल्याचे समाधान मानेल.
जिवंत सासऱ्याला साधं वरण आणि भाकरी करून खाऊ न घालणारी आमची शेजारीन, मात्र सगळे धार्मिक कर्मकांड अगदी आवर्जून करून संस्कृतीचे जतन करुन स्वतः ला संस्कारी समजणारी. त्या सुनेकडून जेवणाचे भरलेले ताट आले. यात चार भाज्या ,आमटी , खीर, कुरडई, पापड, भजी असे अनेक पदार्थ होते. पितृपक्षात पितरे जेवू घातली. याच सूनबाईनी जिवंतपणी आपल्या सासऱ्याला मरणयातना दिल्या आणि आता सासूला छळत आहे.
आश्चर्य आहे! संस्कृतीच्या पळवाटा. पाप करून गंगेत स्नान करून धुवून टाकावे आणि तेच पाणी पवित्र तीर्थ गंगाजल म्हणून बाटलीत भरून आणावे .
जिवंत माणसाला छळून मरणानंतर पितरे जेवू घालून पुण्य बांधून घ्यावे.
संत तुकाराम म्हणतात,
भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान |
भून्कोनी कुत्रा जप करी |
तुका म्हणे स्नान केले मळमुत्रे |
जेवविली पितरे अमंगळे ||
शेजारी राहणारी ताई या वृद्ध दाम्पात्याबद्दल जिव्हाळा असल्याने सुनेच्या नकळत त्यांना काहीतरी चांगले चुंगले खाऊ घालत असे. बस्स, समजताच त्या बाईने भांडून त्या करुणामय शेजारणीशी संबंध तोडून टाकले. काही दिवसानंतर बिचारे सासरे या संसारातून मुक्त झाले. वृद्ध आज्जीबाईंचीपण हीच इच्छा होती कि त्यांच्या हयातीतच पतीने या संसारातून मुक्त व्हावे .नाहीतर माझ्यानंतर माझ्या म्हाताऱ्याची फार आबाळ होईल. त्याला कोण सांभाळेल हीच चिंता सतावीत असे.
हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे किती पालक स्वतः चा कोंडमारा करून जगत असतील?
जिवंतपणीच त्यांना सुखसमाधान दिले तर मरणानंतर आपल्या आंतरआत्म्याला पापाची भीती रहात नाही आणि असले कर्मकांड करण्याची गरज भासत नाही.
मनात पश्चातापाच्या भीतीचे भुत असणारे त्यांच्या आत्म्याला शांत करण्याचे प्रयत्न करतात.
*संत कबीर म्हणतात,*
*जिंदा बाप कोई न पुजे, मरे बाद पुजवाऐ|*
*मुठ्ठीभर चावल लेके कौऐ को बाप बनाए ||*
पितृपक्षात मृत पूर्वजांना कावळ्याच्याद्वारे जेवू घालण्याचे कार्यक्रम हा अतिरेकच वाटतो. जेवू घालायचेच आहे तर
भुकेल्यांना खाऊ घाला. ज्यांची पोटं आधीच भरून फुगलेली आहेत त्यांना काय खाऊ घालता?
जिवंत आईबापाची सेवा करा. त्यांच्या जिवंतपणीच त्यांना काय हवे नको ते खाऊ पिऊ घाला. नंतर हे कर्मकांड केले नाहीतरी काही फरक पडणार नाही. जिवंत आईबापाच्या सेवेचे समाधान मनाला शांती मिळवून देते.
एकदा या जगाचा निरोप घेतला कि पुन्हा येणे नाही.
एकदा माणूस गेला तो गेलाच...!
नाही का....?
Comments
Post a Comment