#नजीर : #मिसाल देनेवाला!
(नजीर या नावाचा अर्थच मिसाल देनेवाला असा आहे! आणि अतिशय सामान्य जिने जगणाऱ्या नजीर चाचा नावाला जागला आहे!)https://factdhingaana.blogspot.com
आझाद चौकातल्या #बेस्ट सायकल (मार्ट) दुकानातल्या नजीर टोपीकर यांच्याविषयी मी एक अंकात लेख लिहिला आहे. त्याचा हा काही भाग. त्याला जोडून दुसरा एक प्रसंग जो आज सकाळी सकाळी घडला... माझ्या मित्रांना हे आवर्जून सांगावसं वाटलं म्हणून ही पोस्ट. https://factdhingaana.blogspot.com
"मुलगी इंजिनिअरिंग करते आहे. तिला इंजिनीयर करण्याचे भव्य दिव्य स्वप्न त्याने पाहिले आहे. पण तिचे शिक्षण पूर्ण करताना तो फक्त कोसळायचा-कोलमडायचा राहिला आहे. मुलीच्या 'जातपडताळणी'साठी त्याने शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवले. वशिला शोधला. अधिकाऱ्यांसमोर हात जोडले आहेत. प्रसंगी वाकून नमस्कार केला आहे. एकदा तर लोटांगण घालता घालता राहिला.
नविदा... जिच्यावर नजीरचाचाचे सगळे काही अवलंबून आहे. जी त्याचे स्वप्न आहे. तिच्यासाठी वाटेल ते करण्याची चाचाची तयारी आहे, असते. #नविदा या नावाचा अर्थच आहे #खुशखबरी देनेवाली... याबाबत विचारल्यावर चाचा नावं ठेवण्याचं श्रेय मात्र बायकोला देतो. नविदा सध्या आष्ट्यात डांगे कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग शिकते आहे. तिच्या जातपडताळणीसाठी चाचाने काय नाही केले? शेवटी या व्यवस्थेत तो तरला! सदफ नावाची एक मुलगी आहे चाचाला. सध्या आठवीत शिकतेय. सातवीला ९६ टक्के मार्क्स मिळाले त्यादिवशी चाचाने ईद साजरी केली. कॉम्प्युटरच्या एका परीक्षेत तिने राष्ट्रीय पातळीवर सातवा क्रमांक मिळवलाय. शाळेने चौकात डिजिटल लावले तेव्हा चाचा आठ दिवस कॉलर ताठ करून गल्लीत फिरत होता. आणखी एक मुलगी बुशरा... चौथीत शिकतेय. तीही हुशार'च' असल्याचा चाचाचा दावा आहे. तिघींनाही शिकवायचं त्याचं स्वप्न आहे खरं; पण पुढं काय आणि कसं वाढून ठेवलंय याबाबत तो अनभिज्ञ आहे!"
#आजचा प्रसंग..!
https://factdhingaana.blogspot.com
१८ ऑक्टोबरची सकाळ... विजयादशमी दसरा... सकाळी सकाळी नजीरचाचा घरी आला. गळ्यात पडला. मला वाटलं ह्या दसऱ्याच्या शुभेच्छा असाव्यात. पण नंतर हातात हात घेत म्हणाला, "साहेब पोरगीचं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं..." डोळ्यांत ओतप्रोत आनंद. मलाही इमोशनल झालं. चाचा भरभरून सांगत होता... "काल दुपारी तिची दोनवेळा मुलाखत झाली. अमेरिकेची कंपनी आहे. टेक्सन ग्रुप ऑफ कंपनीज. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इटली आणि भारतात अहमदाबादमध्ये या कंपनीच्या ब्रँच आहेत... अमेरिकेत बसून तिथला साहेब कॉम्प्युटरवर मुलाखत घेत होता. पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण १२०० जणांच्या मुलाखतीत चौघांची निवड आणि त्यात माझी पोरगी...." नविदा... नावाच्या अर्थाप्रमाणे तिने खूषखबरी दिली होती! चाचांचे पाणावलेले डोळे आणि हालचालीत एक अजब उत्साह जाणवत होता. चाच्यांच्या कष्टाचं चीज झालंय आज..!
Comments
Post a Comment