*रोज स्वतःला विचारा; ‘आजची चांगली गोष्ट काय?
हल्लीच्या धावपळीत बऱ्याचदा आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील अशी वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. अशात कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत. काय असं तुमच्यासोबत होत आहे का? तर मग खास तुमच्यासाठीच हा लेख...
एकदा एक जुना मित्र भेटला. आमची मैफिल जमली, खूप गप्पा मारल्या, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आमच्या गप्पा दरम्यान मला एक गोष्ट सारखी खटकायची ती म्हणजे, आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की, ‘आजची चांगली गोष्ट काय?’ असा प्रश्न तो मित्र सारखा विचारायचा. हा प्रश्न सोपा असला तरी मला नीट उत्तरचं देता येत नव्हतं. मी ‘आजची चांगली गोष्ट काहीच नाही’ असं म्हटलं की तो, ‘काहीतरी असेल, नीट विचार कर’ असं म्हणायचा. मग मी काहीतरी सांगून विषय टाळायचो. तो मात्र त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी ‘आजची चांगली गोष्ट’ म्हणून आवर्जून सांगायचा.
बरेच दिवस हा प्रकार सुरू होता. मग मला लहानातल्या लहान गोष्टी पण ‘आजची चांगली गोष्ट’ वाटू लागल्या. आज एका हॉटेलात मस्त जेवण केलं, आज फिरायला गेलो, आज जास्त वेळ झोपलो, आज मुव्ही पहिला अशी उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला.
सांगायचं तात्पर्य एवढं कि, जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं आपण लहान सुखांकडे लक्ष दिलं पाहिजे. यामुळे दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटतात. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यातली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.
तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही ‘आजची चांगली गोष्ट काय?’ या प्रश्नाला काहीतरी उत्तरं दिलेच पाहिजे.
Comments
Post a Comment