कुणाला खरे वाटणार नाही; पण कधी कधी मी विचारही करतो. तोही आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या पोथी / पुराण / अध्यात्मिक गोष्टींवर. खरंच किती विचारपूर्वक अनेक गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. सगळ्याच गोष्टी एकमेकांशी सलग्न. तसेच अगदी परफेक्ट म्हणता येतील अशा. उदा. आपले त्रिदेव. ब्रम्हा, विष्णू, महेश. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे तरीही एकमेकांना पूरक असेच. उत्पत्ती, स्थिती आणि लय.
ब्रम्हदेव जो सृष्टीचा निर्माता म्हटला जातो. आणि त्यांची अर्धांगी आहे सरस्वती. जिला बुद्धीची आणि ज्ञानाची देवता म्हटले जाते. आता त्यांचे देवत्व बाजूला ठेवून विचार केला तर कोणत्याही गोष्टीची निर्मिती करायची तर तुमच्याकडे ज्ञान असणे गरजेचे असते. ज्ञानाशिवाय निर्माण झालेली गोष्ट बऱ्याचदा त्रासदायकच ठरते. थोडक्यात ब्रम्हदेवांना ‘क्रिया’ मानले तर सरस्वती ‘साधन’ ठरते.
श्रीहरी विष्णू ज्यांना सगळ्यांचा पालनहार म्हटले जाते. थोडक्यात आरंभापासून ते अंतापर्यंतचा प्रवास. यामध्ये त्या गोष्टीचे संवर्धन, पालनपोषण या गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यांची अर्धांगी आहे लक्ष्मी. लक्ष्मीला द्रव्याची / संपत्तीची देवता म्हटले जाते. म्हणजेच जर कोणत्याही गोष्टींचे संवर्धन / पालनपोषण व्यवस्थितपणे करायचे असेल तर त्यासाठी द्रव्याची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. जवळ द्रव्य नसेल तर कुणाचेही पालनपोषण चांगल्याप्रकारे होऊ शकणार नाही. थोडक्यात श्रीहरी विष्णूंना ‘क्रिया’ मानले तर लक्ष्मी ‘साधन’ ठरते.
तिसरे ते महादेव शिवशंकर. यांचे कार्य लयाचे. कोणतीही गोष्ट असो, आरंभ आहे तर त्याचा अंतही असणारच. त्यासाठी गरज असते ती शक्तीची. त्यामुळे शंकरांची अर्धांगी आहे पार्वती. पार्वतीचे दुसरे नाव शक्ती आहे. पार्वतीला शक्तीची देवता म्हटले जाते. बऱ्याचदा नकारात्मक गोष्टींचा नाश करायचा तर त्यासाठी गरज असते ती शक्तीची. ‘शक्तिवीण सर्व क्षीण’ म्हणतात ते काही खोटे नाही. आतापर्यंत वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी जन्मलेले प्रत्येकजण याच गोष्टीमुळे शक्तीसंपन्न दाखवले गेले आहेत. ते शक्तीसंपन्न होते म्हणूनच वाईटांचा नाश करू शकले. थोडक्यात शंकरांना ‘क्रिया’ मानले तर शक्ती ‘साधन’ ठरते.
पुराणातील इतर गोष्टींचा विचार केला तर त्यातही प्रत्येक देवाला एकेका तत्वाचा अधिकारी दाखवले आहे. अग्निदेव अग्नितत्वाचा अधिपती तर वरुणदेव जलाचा अधिपती. पवनदेव वायूचा अधिपती तर यमदेव मृत्यूचा अधिपती. सूर्यदेव तेज देतो तर चंद्रदेव शीतलता. आणि या सगळ्यांचा राजा इंद्रदेव. इंद्राला देवांचा राजा म्हटले जाते; पण त्याचे वागणे सगळे माणसासारखे. त्याच्यात चांगुलपणा आणि शक्ती गुण आहेत; तसेच अभिमान, असूया, मत्सर, भोगविलास, अविवेक हे अवगुणही दिसून येतात. त्याला कायम स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावे लागते. याच कारणाने त्याला कधी स्वर्गाचे राज्य मिळते तर कधी असुरांना घाबरून रानोमाळ भटकावे लागते. त्याचा कधी जय होतो तर कधी पराजय. त्याचे जसे कर्म असेल तसेच फळ त्याला भोगावे लागते. थोडक्यात इंद्र माणसाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याला सहाय्यभूत ठरणारे इतर देवता हे त्याचे साधन ठरतात.
थोडक्यात काय तर पुराणात जे काही लिहिले आहे त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा की त्याचा मतितार्थ समजून त्यानुसार आपले वर्तन ठेवायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे.
- विचारवंत मिलिंद...
टीप :
१. या पोस्टचा उद्देश कुणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा नाही. त्यामुळे या पोस्टकडे त्या दृष्टीने पाहू नये ही विनंती.
२. ज्यांचा पुराणांवर विश्वास नाही त्यांनी ही पोस्ट म्हणजे एका अविचारी माणसाची वायफळ बडबड असे समजून या पोस्टकडे दुर्लक्ष करावे... कारण जसा देव नाकारण्याचा तुम्हाला कायदेशीर हक्क आहे तसाच देवाचे अस्तित्व स्विकारण्याचा माझा कायदेशीर हक्क आहे.
धन्यवाद...
Comments
Post a Comment