“आपले छंद आणि आपण”
“आपले मानसशास्त्र” ह्या समुहावर माझ्या “स्थितप्रज्ञ” ह्या विषयांतर्गत दिनांक 31 डिसेंबर, 2017 च्या लेखाला आपल्याकडून भरभरुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यासाठी सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानते. तोच धागा पुढे ओऊन मी आयुष्याची शाल विणायचा प्रयत्न केला आहे.
‘दुःख’ जे प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या न कुठल्या रुपात कधी न कधी येतंच. त्याला सामोरं जाता यायला हवं. खरं तर आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला कडकडून भेटायला हवं. दुःखाचा विचार करीत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसेनासं होतं. आपण धुपासारखं बनायला हवं. धगधगत्या विस्तवावर कुणी का टाकेना, विस्तवाचे चटके बोचायला लागले की वातावरणात सुगंध देण्याचं काम आपण करीत रहावं. मनाला यातना देणार्या गोष्टींना / व्यक्तिंना जमेल तिथे प्रतिरोध न करता त्यांच्यापासून अलिप्त रहावं.
आयुष्यातील दुःखांचाही महोत्सव करता यायला हवा. दुःखानंही आपल्या दुःखात सामिल होऊन आपण ‘दुःख’ असल्याचं विसरायला हवं.
कलेचा कोणता न कोणता वारसा व देणगी मिळालेला माणूस थोडं वेगळं आणि उत्कृष्ट जगू शकतो, जास्त काळ टवटवीत राहू शकतो..!!
आता ही कला, छंद आपल्या सगळ्यांमध्ये दडलेले असतात. त्या कलागुणांना शोधून काढायचं काम आपलं. मी माझ्यात असलेल्या कलेचा पूरे पूर वापर करते. आता हेच पाहा…. मी खाली काही माझ्या कलाकृती जोडल्या आहेत…
1. आॅईल पेंटिग - माझ्या घरातील जेवणाचे टेबल (Foldable Dining Table) - फोल्ड केल्यावर वरची प्लायवूडची बाजू. त्यावर मी स्वतः आॅईल पेंटिग केले आहे.
2. एम्बाॅझ पेंटिग - हे वाॅल पेंटिंग आहे जे एम्बाॅझ इफेक्ट देऊन केले आहे.
3. कॅनव्हास पेंटिंग - हे कॅनव्हास वर काढलेले चित्र अॅक्रिलिक कलर्स वापरुन पेंट केलेले आहे.
4. वुडन आर्ट वर्क - हे प्लायवूडवर आर्टवर्क केले आहे ज्यामध्ये एमसीलचा गणपती काढून अॅक्रिलिक कलर्स वापरुन पेंट केलेले आहे.
5. फॅब्रिक पेंटिग्स - आपल्या घरातील उशांचे अभ्रे, सोफ्यावरील लोड्स, हातरूमाल, फराळाच्या किंवा फुलांच्या ताटावरील कव्हर्स वर अशा प्रकारे डिझाईन्स काढून फॅब्रिक कलर्स ने पेंट केलेले आहे.
6. पेन्सिल स्केचिंग - कधीतरी नुसतेच स्केच करावेसे वाटते. पेन्सिल्सने काढलेले स्केचेस.
आता तुम्ही म्हणाल सर्व कलाकृती खूपच “बालिश” दिसताहेत. पण असेना का..बालिश..! ते काढताना तुम्हाला मिळणारा आनंद हा काही कमी नसेल. ते काढण्यासाठी तुम्ही तुमचा जो वेळ दिलेला असेल त्या वेळेपूरते तुम्ही तुमच्या दुःखाला रामराम ठोकलेला असेल. किंबहुना आपण स्वतः आपल्या हाताने कलाकृतीकडे पाहून मिळणारा अत्यानंद आपल्याला एक भलताच आविष्कार केल्याची जाणीव करुन देईल अन् ती “जाणीव “ म्हणजे दुःखाला पूर्णपणे आपल्या आयुष्यातून घालवून दिल्याची हमीच देईल.
“दुःख-दुःख” करीत दुःखाला कवटाळून बसणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. तेव्हा आपणच आपल्या दुःखाला कुरवाळून आपल्या भाग्याला /नियतीला कोसून कुरबुरी करीत जगत असतो. ह्या कुरबुरी /तक्रारी करणं बंद करा अन् आनंदानं जगण्याचा प्रयत्न करा.
आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला आणखीन सुंदर बनविणे आपल्याच हाती असते. आपल्यात असलेल्या कलाकृतींना प्रसवू द्या. त्यांनाही ह्या दुनियेचा आस्वाद घेऊ द्या….उमलू द्या… खुलू द्या…..
सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!!!
धन्यवाद..
रेखा वैद्य
Comments
Post a Comment