🌿🌷🍃
*मन आवरायला हवे*
चला, आज मन आवरायला हवे
केव्हापासून ठरवतोय
कानाकोपऱ्यात साचलेल्या...
या जळमटांना काढायला हवे!
उगीच जपून ठेवलेल्या
जुन्या घटना, प्रसंग
नकोसे...
तरीही जपलेले क्षण
तातडीने फेकून द्यायला हवेत.
वेळचेवेळी मन आवरायला हवे.
माळावरचा अहंकार.. क्रोध
मधेच डोके वर काढतात लेकाचे
जुन्या पोत्यात बांधून......
आजच फेकून द्यायला हवे.
मन आवरायलाच हवे.
मनाच्या दर्शनी कप्प्यात
पाय पसरून निवांत पडलेत
मोह आणि माया..
सारं आयुष्य बरबाद करतायत.
त्वरेने नष्टच करायला हवेत..
मनाचे कोपरे आवरायला हवेत.
ह्या द्वेषाच्या जळमटांनी
मनाचे सारे कोपरे भरून गेलेत.
कितीवेळा झाडलेत तरी
हजर आहेत.. पुन्हा पुन्हा..
रोजच तिथे झाडू फिरायला हवेत.
मनाचे कोपरे घासायला हवेत.
पुसायला हवीत तावदाने
क्षमेच्या फडक्याने...
झटकायची संशयांची धूळ
दयेच्या झटकणीने...
काचेपल्याडचे निर्मळ झरे...
रोज दिसायला हवेत
आपले मन आवरायला हवे!
उघडायला हव्यात
मनाच्या घट्ट खिडक्या
खेळू देत मोकळे वारे...
विसरायचं सारे जुनेपाने
समज... गैरसमज...
झाले गेले... विसरायला हवे
आता मन आवरायला हवे.
मस्त वाटतंय आता
हलकं हलकं...
म्हातारीच्या तरंगत्या
पिसासारखं..
अलगद टेकलोय आता..
वास्तवाच्या जवळ
'जमिनी'वर..!
येथेच आता रमायला हवे.
वरचेवर मन आवरायला हवे!😌
Comments
Post a Comment