आठवणी व.पु.काळे यांच्या अर्थातच “पार्टनर” च्या !!!
व.पु.काळे “ सिर्फ नाम ही काफी है ” असचं व्यक्तिमत्व ! हा वल्ली माझ्या आयुष्यात, मी ११वी/१२वीत असताना आला, आणि कधी त्यान माझ्या व्यक्तिमत्वाचा ताबा मिळवला ते मलाही समजले नाही.
साधे-सोपे शब्द, छोटे छोटे संवाद, उत्तम निरीक्षण शक्ती, आपल्या अवतीभवती घडणारे साधे प्रसंग, अनेकदा आपण आपल्याच जीवनातील प्रसग वाचत आहोत असेच वाचकाला वाटावे इतके कॉम्मन लेखन, म्हणूनच ह्याचा प्रत्येक शव्द वाचताना तो डोळ्यासमोर “७० mm मोठा आणि स्पष्ट उभा राहतो ” ही ह्या माणसाच्या लेखनाची वैशिष्टे !! त्यामुळेच याची माझ्या मनावर कायम पकड घट्ट राहिली.
काही खर काही खोट मधील जे.के. – भदे अशी पात्रे मला माझ्याच आजूबाजूची वाटू लागली. दोस्त, स्वर, सखी, संवादिनी, रंग मनाचे, लोंबकाळणारी माणसे, कर्मचारी, रंगपंचमी अशा विविध कथा संग्रहामधून माणसांच्या स्वभावाची विविधता, वागण्याच्या तऱ्हा – सवयी , त्यामागची कारणे, काही वेळी असलेली अगतिकता हे सर्व डोळ्यासमोर जसे दिसत होते, तसेच ते मनांत कुठेतरी खोलवर रुजतही होते. नकळत मीही माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसाच्या अशा सवयी-तऱ्हा-लकबी टिपण्याचा प्रयन्त करू लागलो. त्याच्या मागे असणाऱ्या कारणांचा शोध घेऊ लागलो, आणि मला वेगवेगळ्या गोष्टी समजत गेल्या, त्यातील मानसशास्त्र उलगडताना “ आपण सारे अर्जुन “ मधील नायकाची उद्विगता, तर त्यातील पात्रांची स्वताःशीच असलेली स्पर्धा, त्यातून निर्माण होणारी अगतिकता हे मला “भवसागरासम” वाटत होते. हे अनुभवताना एक वेगळ्याच “अध्यात्मिक सुखाची” जाणीव होत होती, आणि त्यात मी गुंतत जात होतो.
रोज नवरा रात्री १.३० वाजता घरी आल्यावर ही, त्याच्यासाठी त्याला आवडते म्हणून केसात गजरा माळून गरमागरम स्वयंपाक करणारी नायिका एकीकडे, आणि दुसरीकडे आयुष्याचा “महोत्सव” करणारा सजीव आणि निर्जिव सर्वाना भरभरून आनंद देणारा, समोर येणाऱ्या प्रसंगातुन एक सकारात्मक दीशा देणारा नायक आणि त्याची एका अर्थी अरसीक, कुठल्याच गोष्टीत मन न रमवणारी पत्नी ! अशा कितीतरी कथा- पात्रे एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटाव्यात इतक्या बेमालूमपणे आपल्या समोर येतात, आणि तरीही दोन्ही बाजू परिणामकारक आणि बरोबरच वाटतात, ही किमया व. पु. लीलया हाताळतो !
व. पु. च्या फिलोसॉफीला वेगळीच झालर आहे, जशी स्टेजवर दर्शनीय भागात असते आणि त्यामागे लाईट, माईक असे कितीतरी गोष्टी लपल्याचे सतत जाणवत राहते, अगदी तशीच!!. आई आणि बायको यातील फरक- M आणि W ने सांगणारा व.पु., दोघांच्यात तिसरा अडचण न होण्याची कला, किती सहजपणे सांगून जातो. मित्राला सल्ला देतानाही तो कशा पद्धती द्यावा, त्यात पथ्ये काय पळावीत आणि त्याच्या पाठीशी कसे भक्कमपणे उभे रहावे, त्याचे निर्णय त्यालाच घेण्यासाठी हळूच कसे शिकवावे? आणि एके दिवशी कसे अचानक गायब व्हावे, हे देवाच्या रुपात “पार्टनर” होऊन सांगणारा व.पु. जेव्हढा गूढ वाटतो, तितकाच तो निस्सीम आणि त्याच्यावर प्रेम करावा असाही वाटतो. “पार्टनर – वपूर्झा – प्लेजर बॉक्स” ह्या मला पारायणे करण्याच्या “पोथ्याच” वाटतात !! ह्या “पोथ्या” वाचता वाचता मी इतरांचा कसा “पार्टनर” झालो, हे माझ मलाही समजले नाही. व.पु.च्याच शब्दात सांगायचे झाले तर, “मीत्र परिसा सारखे असावेत, म्हणजे आयुष्याचे सोने होते” या प्रमाणे व.पु. तू माझ्या आयुष्याचे सोने केलेस. आयुष्य जगताना एक निर्मळ – निस्वार्थी आनंद कसा मिळवायचा, आयुष्यातील प्रत्येक प्रसंगी कसा “महोत्सव” करायचा, हे तू शिकवलेस, आणि तुझे आभार मानू न देता अचानकपणे आमच्याही आयुष्यातून तू अचानक गेलास ??? गायब झालास?? पण तुझ्या आठवणी मनांत आहेत, ग्रंथालयात – पुस्तकांच्या दुकानात, CD – कॅसेट्स वर शब्दाकीत झाल्या आहेत, त्या तू कशा गायब करणार?? त्यावर तर माझ्या सारख्या तुझ्या अनेक वाचकांचाच हक्क आहे.. तो तुझाही नाही.. समजल का तुला?
मित्रा, तू हसवतोस, रडवतोस, गुपीते ही सांगतोस, रंजक गोष्टीत रमवताना स्वताचे दोष ही लक्षात आणून देतोस, तुझे कथाकथन तर सादरीकरण आणि फिलोसॉफी चे उत्तम आविष्कार वाटतात, मित्रा! तू जीवन “जगायला” शिकवतोस, प्रेरणा देतोस, ठेच लागली तर हिम्मत देतोस, दोस्ता !! तुला माझा सलाम !!!
सदैव तुझाच,
सचिन डांगे
Comments
Post a Comment