मनाला भावले, म्हणून copy paste करत आहे.
व्हॉटसअपवरून भयंकर अपघाताचे व्हिडीओ शेअर करणारया आणि जिज्ञासेने, उत्सुकतेने ते पाहणाऱ्या 'गुणी' लोकांनी ही पोस्ट आवर्जून वाचावी.
नागपुरातील कसाबपुरा तीन नळ चौकाजवळ राहणारा सौरभ हा प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. सौरभचे वडील एनसीसीमध्ये अधिकारी आहेत तर आई गृहिणी आहे. बहीण शिकत आहे.
२ महिन्यांपूर्वी त्याने एक रस्ता अपघात बघितला होता. त्यात एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. त्याचा सौरभला धक्का बसला होता. त्यामुळे तो रात्रीच्या वेळीही प्रचंड घाबरायचा. झोपेतून दचकून उठायचा. यादरम्यान त्याचाही एक छोटा अपघात झाला होता. "अपघातात मृत्युमुखी पडलेला मुलगा मला बोलावतोय..' असे तो सारखं सांगायचा. तो कमालीचा अस्वस्थ असायचा.
कालच्या रविवारी रात्री कुटुंबातील लोक नातेवाइकाकडे गेल्यामुळे सौरभ आणि त्याची बहीण असे दोघेच घरी होते. सौरभ अभ्यासाच्या निमित्ताने खोलीत होता. तेथे त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आई-वडील घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिस घटनास्थळावर पोहोचल्यावर त्यांना सौरभच्या शर्टाच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात त्याने "आपला भुतांवर विश्वास नाही. मात्र, मला आत्मा बोलावत असल्याने मी जातो आहे..' असे लिहून ठेवले होते.
सौरभला वेळीच मानसोपचार मिळाले असते तर ही घटना टाळता आली असती. तज्ज्ञांच्या मते कोणताही धक्का बसला की व्यक्ती अॅक्युट स्ट्रेस डिसऑर्डरमध्ये जाते. सामान्यपणे महिनाभरात मनाची ताकद असलेल्या व्यक्ती अशा धक्क्यातून बाहेर पडतात. मात्र, १२ ते १४ टक्के लोकांत मनाची कमकुवतता परिवर्तित होऊन ती व्यक्ती तणावात जाते. डिरिलायझेशनमध्ये ती व्यक्ती स्वत:चे अस्तित्व विसरते. जागेपणीही त्याला भास होतात. या प्रकाराला "मायक्रो सायकोटिक एपिसोड' अथवा "इम्परेटिव्ह हॅल्युसिनेशन' असेही म्हणतात. योग्य उपचार घेतले तर हे तात्कालिक आजार सहज बरे होऊ शकतात. त्यात घाबरण्याजोगे काही नाही.....
काही लोक व्हॉटसअपवरून भयंकर अपघाताचे व्हिडीओ शेअर करत असतात. रक्तबंबाळ झालेली माणसं, विविध अवयव तुटून पडलेली हृदयद्रावक दृश्ये, अपघातात विव्हळत असलेल्या व्यक्ती, चक्काचूर झालेली वाहने, छिन्न विच्छिन्न मृतदेह ह्या काही आवर्जून वा आवडीने पाहण्याच्या शेअर करण्याच्या गोष्टी नाहीत. यामुळे मानसिक दौर्बल्य येऊ शकते किंवा व्यक्ती तणावग्रस्त होऊ शकते. शिवाय अशी दृश्ये मनाच्या पटलावर कोरली जातात आणि त्यामुळे एकाग्रता भंग होण्यापासून एकटेपणात दडपण येण्याची भावना वाढीस लागते. त्यातून व्यक्ती जर कमजोर असला तर त्याचे पर्यवसान सौरभच्या बाबतीत घडले तसे होऊ शकते. सौरभने ती दृश्ये पाहिली तेंव्हा तो तिथेच होता त्याला ते टाळता आले नाही, हे लोक मात्र जगाच्या पाठीवरचे व्हिडीओ शेअर करून नसती दुखणी ओढवून घेतात.
तेंव्हा लोक हो असे व्हिडीओ शेअर करणं आता तरी थांबवा... हे वाईट आहे ही देखील एक विकृतीच आहे...
- समीर गायकवाड
(टीप - पोस्टचा आधार घेऊन कुणी अंधश्रद्धेचे दुकान मांडून बसू नये)
Comments
Post a Comment