Skip to main content

#दिवाळीचा विषय काढला...

बोलता बोलता सहज मी
दिवाळीचा विषय काढला
एकदम माझ्या मित्राचा
चेहरा पांढरा पडला

तो म्हणाला दिवाळी आली की
हल्ली धड धड होतं
जुनं सारं वैभव आठवून
रडकुंडीला येतं

चार दिवसाच्या सुट्टीत आता
कसं होईल माझं
एवढ्या मोठ्या वेळेचं
उचलेल का ओझं ?

मी म्हटलं अरे वेड्या
असं काय म्हणतोस
सलग सुट्टी मिळून सुद्धा
का बरं कण्हतोस ?

काय सांगू मित्रा आम्ही
चौघ बहीण भाऊ
कुणीच कुणाला बोलत नाही
मी कुठे जाऊ?

आता कुणी कुणाकडे
जात येत नाही
आम्हालाही दोन दिवस 
कुणीच बोलावीत नाही

चार दिवस कसे जातील
मलाच प्रश्न पडतो
लहानपणीचे फोटो पाहून
मी एकटाच रडतो

पूर्वीच्या काळी नातेवाईक
बरेच गरीब होते
तरीही ते एकमेकाकडे
जात येत होते

कुणाकडे गेल्या नंतर
आतून स्वागत व्हायचं
सारं काम साऱ्यानी
मिळून मिसळून करायचं

सुबत्ता फार नव्हती
पण वृत्ती चांगली होती
गरिबी असून सुद्धा
खूप मजा होती

मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
एखादाच शेंगदाणा भेटायचा
त्याप्रसंगी आनंद मात्र
आभाळा एवढा असायचा

लाल,हिरव्या रंगाचे
वासाचे तेल असायचे
अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात
बुडाला जाऊन बसायचे

उत्साह आणि आनंद मात्र
काठोकाठ असायचा
सख्खे असो चुलत असो
वाडा गच्च दिसायचा

चपला नव्हत्या बूट नव्हते
नव्हते कपडे धड
तरीही जगण्याची
मोठी  धडपड

सारे झालेत श्रीमंत
पण वाडे गेले पडून
नाते गोते प्रेम माया
विमानात गेले उडून

घरा घरात दिसतो आता
सुबत्तेचा पूर
तरी आहे मना मनात
चुली सारखा धूर

पाहुण्यांचे येणे जाणे
आता संपून गेले
दसरा आणि दिवाळीतले
आनंदी क्षण  गेले

श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे
मोठे  सण असतात
फ्लॅट आणि बंगल्या मधे
दोन चार माणसं दिसतात

प्रवासाची सुटकेस आता
अडगळीला पडली
त्या दिवशी माझ्याजवळ
धाय मोकलून रडली

हँडल तुटलं होतं तरी
सुतळी बांधली होती
लहानपणी तुमची मला
खूप सोबत होती

सुटकेस म्हणली सर मला
पाहुण्याकडे नेत जा
कमीत कमी दिवाळीत तरी
माझा वापर करीत जा

सुटकेसचं बोलणं ऐकूण
माझं ही काळीज तुटलं
म्हणलं बाई माणसाचं
आता नशीब फुटलं

म्हणून म्हणतो बाबांनो
अहंकार सोडा
बहीण भाऊ काका काकू
पुन्हा नाती जोडा

संदुक आणि वळकटीचे
स्मरण आपण करू
दिवाळीला जाण्यासाठी
पुन्हा सुटकेस भरू...

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...