अनिल अवचटांचा लेख -
" दिवाळी ओतूरची.."
आयुष्यात नंतर इतक्या दिवाळ्या पाहिल्या, प्रचंड झगमगाट पाहिला, फटाक्यांची आतषबाजी पाहिली पण लहानपणी ओतूरला अनुभवलेल्या दिवाळीची सर त्याला कधीच आली नाही. ओतूरच्या त्यावेळच्या दिवाळीत होतं काय, फार पैसा नव्हता, फटाक्याची आतषबाजी नव्हती, फार भारी कपडे नव्हते, नेहमीचेच फराळाचे पदार्थ होते, घरीच बनवलेला आकाशकंदिल होता, गावच्या महादू कुंभाराकडून आणलेल्या पणत्या होत्या, एकाच रंगाच्या ठिपक्या ठिपक्याच्या रांगोळ्या होत्या. पण सगळ्यात मोठं काय होतं तर प्रचंड उत्साह होता,समाधान होतं आणि सगळ्यांना बरोबर घेवून सण साजरा करण्याची मानसिकता होती. आता ते सूडून सगळं काही आहे. म्हणून तर ओतूरची दिवाळी डोक्यातनं जात नाही. प्रत्येक दिवाळीला प्रकर्षाने आठवते.
दिवाळीच्या सुट्या लागल्यावर आमची लगबग असायची ती दारासमोरचा ओटा दुरुस्त करायची. बहिणींचा आग्रह असायचा की दारासमोरचं अंगण सपाट करुन द्यायचा. त्यांना तिथे सडा टाकून रांगोळी रेखाटायची असायची. नदीवर जावून कुंपे गोळा करायचे. कुंपे गोळा करताना नदीच्या काठा काठाने थेट बाबितापर्यंत रपेट व्हायची. उपरण्याच्या गाठोड्यात कुंप्यांचा बोजा घेवून दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत घरी पोहोचायचं. कुंपे गोळा करण्यात मजा असायची. नदीकाठच्या वाळूत भटकायचं, मधेच एखाद्या झाडावर उंच दगड भिरकवायचा. कधी पाण्यातून चालायचं. मधूनच एखाद्या झाडाखाली सावलीला रेंगाळायचं. नदीचा काठ त्यावेळी सुनसान असायचा. केवळ पाण्याच्या झुळझुळीचा आवाज आणि एखाद्या पक्षाचा किलकिलाट. बाकी शांत. ती शांतता आमच्याच आवाजाने बिघडायची. त्या शांततेला एक संगीत होतं, एक सुगंध होता आणि एक सौदर्य होतं. आजही नदीकाठच्या झाडाखाली आमचं टोळकं बसलेलं, समोरची नदी, पलिकडची वाळू सगळं ताजेपणाने आठवतंय.
मागच्या अंगणात काट्याकुट्या, धलप्यांची शेकोटी करायची आणि त्यात कुंपे भाजायचे. कधी कधी आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी असलेल्या मागच्या पडवीतल्या चुलीत भजायचे. मग उखळात नाहीतर खलबत्यात कुटायचे, चाळायचे आणि डालडाचा डबा भरुन रांगोळी तयार ठेवायची.
दिवाळीची चाहूल सुट्या लागताच यायची. पण खरी चाहूल लागायची वसंत तेल्याने आणि छबु कासाराने फटाक्याचं दुकान लावलेलं दिसलं की दिवाळी जवळ आल्यासारखी वाटायची. फटाक्याचे हे स्टॉल म्हणजे एक छोटीसी मांडणी असायची. दहावी लक्ष्मी बारसे सर, काही लवंगी फटाक्याचे पुडे, फुलबाज्या, मिरच्या, पानपट्ट्या, भुईनळे, भुईचक्रे. बस. आता एखाद्या घरात जितके फटाके आणतात त्यापेक्षा कमीच फटाके ह्या दुकाना असायचे. हे स्टॉल रोज पाहिलेच पाहिजेत असं समजून तात्याकुईचा विजा आणि मी दिवसातून दोन दोनदा त्या स्टॉलपुढे जावून घोटाळत असू.
नर्कचतुर्थी म्हणजे खरी दिवाळी वाटायची. आदल्या दिवशी लवकर झोपायची घाई केली जायची. सकाळी लवकर उठायचंय, आता झोपा असा आग्रह असायचा. नर्कचतुर्थीच्या आदल्या रात्री गावाचा काही भाग जागा असायचा. विशेषता चंदु टेलर आणि न्हाव्याचं दुकान. सकाळी आंघोळ होईपर्यंत चंदुकडून कपडे मिळाते तरी नशीब अशी अवस्था असायची. मुलं संध्याकाळपासून चंद्याकडे चकरा मारायची. “झाले कां?“. जा देतो थोड्या वेळाने, दिवाळी उद्या आहे ना, देतो बरोबर. म्हणत म्हणत पहाटे केंव्हातरी चंदुकडून शर्ट मिळायचा. गुंड्या लावायच्या राहिलेल्या असायच्या. मग गुंड्याच्या जागी पिन लावायची आणि नवा शर्ट घालायचा.
ओतूरला त्या दिवशी पहाटेच लगबग जाणवायची. बहुतेक वर्षी दिवाळीला कडाक्याची थंडी असायची. अंथरुणातून बाहेर याची इच्छा नसायची. कसं बसं डोळे चोळत उठायचं. मग तेल चोपडलं जायचं, मोरीत भडाभडा अंघोळ घातली जायची. उटणं, हमाम साबण लावला जायचा. मधे दिवा ओवाळायचा आणि मग राहिलेलं पाणी घ्यायचं. याच दिवशी आंघोळीला नेहमीपेक्षा अधिक गरम पाणी मिळायचं. उटणं घरीच बनवलेलं असायचं. वासाचा साबण गावात दिवाळीच्या काळातच मिळायचा. इतर वेळी आंघोळीला सनलाईटच वापरला जायचा. नंतर डोक्याला वासाचं तेल लावायचं. तेल किती लावायचं याचा अंदाज नसल्यानां थोड्याच वेळा कपाळावर उतरायचं आणि तेल्या मारुति व्हायचा. सुगंधी तेल म्हणजे आवळेल तेल नावाचं एक तेल मिळायचं, आणि तेव्हडंच मिळायचं.
आंघोळ झाल्यावर बाहेर यायचं. दोस्त जमायचे. तुझी आंघोळ अगोदर झाली की माझी अशा चर्चा घडायच्या. मग कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला जायचं. तोवर उजाडलेलं नसायचं. धंडीचा कडाका असायचाच, पण आंघोळ झाल्यावर तो कमी जाणवायचा. त्याकाळी माझ्या एकाही मित्राकडे स्वेटर नव्हता. कुडकुडत देवळाकडे जायचं. पाचवी सहावीत असताना तर ही थंडी अधिकच छळायची. मी मुळातच लुकडा असल्यानं थंडी थेड हाडापर्यंत गेली असं वाटायचं.
कपर्दिकेश्वराहून परत आल्यावर वेशीपासून गावाचं दर्शन व्हायचं. सगळ्यांच्या दारापुढे असलेले हिरवेगार शेणसडे, त्यावर ठिपक्या ठिपक्यांच्या मोठ मोठ्या रांगोळ्या, दारासमोर लावलेल्या पणत्या, शेकाट्याला टांगलेला आकाश कंदिल. सगळं गाव म्हणजे एक समारंभाचा नटवलेला मांडव वाटायचं. बायकांची रांगोळ्यांची एक स्पर्धाच असायची.
ओतूरच्या दिवाळीला अवघं गाव, झाडं झुडपंही उत्साहाने तुडुंब भरलेली जाणवायची. वातावरणात एक आगळं चैतन्य संचारायचं. लवंगी फटाक्याचा दोन आण्याचा एक सर आणला की तो सोडला जायचा आणि घरातल्या मुलांमधे त्याचे वाटे करायचे. प्रत्येकाच्या वाट्याला दहा वीस लवंगी फटाके यायचे. एकेक करुन वाजवायचे. त्यात आणखी मजा करण्यासाठी मग फटाका पेटला की त्यावर एखादं पत्र्याचं डबडं ठेवायचं. फटाका उडाला की डबडं उंच उडायचं. त्यावेळी लवंगी मिरची नावाचा फटाका मिळायचा. लग्नात वाटायचे पेठे बांधतात तसल्या रंगीत कागदात फटाक्याची दारु भरुन त्याला मिरचीचा आकार दिलेला असायचा. हा फटाका लाल आणि हिरव्या कागदातला असायचा. ही मिरची टोकाला पेटवली की टाकून द्यायची. ही कुठेही जायची. कुठे जाईल याचा कुणाला नेम नाही. लहान मुलांसाठी तडतडी असायची. ती दगडावर घासली की तडतड कर जळायची. टिकल्यांसाठी आमच्या लहानपणी पिस्तूल आलेले नव्हते. दगडानेच टिकली वाजवायची. नंतर गायतोंड मिळायला लागले. पितळी छोट्या गाईच्या तोंडात टिकली ठेवायची आणि दोरा बांधलेलं ते तोंड उंच फेकायचं. जिथे पडेल तिथे आवाज यायचा.
आता शहरात सगळ्या रंगाच्या रांगोळ्या मिळतात,पण ठिपक्याच्या मोठ्या रांगोळ्या काढणार्या उरल्या नाहीत. आता घरांना अंगणे नाहीत, त्यामुळे शेणसड्याची गंमत कळणार नाही. दारापुढे पणत्या लावल्या जातात, पण एकमेकांविषयीच्या आपुलकीची ज्योत केंव्हाच विझली आहे. दिवाळीला आता सुगंध स्नेहाचा येण्याऐवजी पैशाचा येतो. सगळ्यांना बरोबर घेवून साजरी होणारी दिवाळी वेगळीच होती. आता तिच्या आठवणीच उरल्यात.
Comments
Post a Comment