Skip to main content

#मी पाहिलेली जत्रा...

पुण्यापासून जवळच मुळशी तालुक्यातील मुठा हे माझे गाव. गावची जत्रा म्हटलं कि जसा एक वेगळाच उत्साह सर्वांच्या मनात असतो तसाच उत्साह आणि एक आनंद माझ्या मनात असतो. कधी एकदा गावच्या जत्रेचा दिवस उजाडतो आणि कधी मी गावाला सर्व भावंडांसोबत जातेय असे मला वाटते. गावच्या जत्रेला जाताना आम्ही सर्व भावंडे आणि मावशी-काका, मामा-मामी, आजी-आजोबा असे सगळे एकत्र गावाला जातो. गावी जाण्याआधी आम्ही सर्व भावंडे आनंदात असल्यामुळे सर्व तयारी करण्यास घरातील मोठया माणसांना मदत करतो. आमचीसुद्धा तयारी आम्ही जाण्याआधी दोन दिवस आधीच करण्यास सुरुवात करतो.

आम्ही भावंडे पिण्याचे पाणीसुद्धा गावाला नेतो कारण आम्हाला गावाकडचे विहिरीचे पाणी आवडत नाही. आम्ही एसटी किंवा चारचाकी गाडीने गावाला जातो. फार फार वर्षांपूर्वी आमच्या गावी बैलगाडीने जावे लागायचे कारण त्यावेळी जाण्यासाठी काही साधन नव्हते आणि रस्तासुद्धा खूप लहान,खराब होता, असे आमचे आजी-आजोबा सांगतात. पण आता आमच्या गावाला जायला इतरही छोट्या मोठ्या वाहनांची सोया झाली आहे. तसेच आमच्या गावापासून थोड्याच अंतरावर लवासा सिटी झाली आहे. त्यामुळे रस्तेसुद्धा खूप सुधारले आहेत आणि गावातसुद्धा खूप प्रगती झाली आहे. पूर्वी आमच्या गावामध्ये दोन-तीनच दुकाने होती पण आता गावात भरपूर दुकाने आणि बँकसुद्धा झाली आहे. गावामध्ये पोहोचल्यानंतर सर्व नातेवाईक खूप दिवसांनी भेटतात आणि कसे आहात याची चौकशी करतात. गावात सर्वांच्याच घरी जत्रेसाठी भरपूर पाहुणे पुण्यातून तसेच इतर शहरातून आलेले असतात.जत्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांना भेटतात त्यामुळे एक आपुलकीची भावना सर्वांच्याच मनात निर्माण होते आणि विचारांची देवाण-घेवाण सुद्धा होते.

गावाची जत्रा ही विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरामध्ये भरते. त्यामुळे सर्व गावकरी मिळून जत्रेच्या आधी मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करतात. तसेच मंदिरसुद्धा खूप स्वच्छ करतात. त्याचबरोबर गावातील सर्वच मंदिरांमध्ये त्यादिवशी साफसफाई केली जाते. विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर जत्रेच्या दिवशी रंगबेरंगी फुलांनी सजवतात. त्यानंतर गावातील सर्व मंदिरांमध्ये मनोभावे पूजा,आरती करतात आणि नैवेद्य दाखवतात. सर्वांच्याच घरी त्यादिवशी पुरणपोळीचा बेत असतो.

गावच्या जत्रेच्या पहिल्या दिवशी देवाची पालखी संपूर्ण गावात फिरते. सर्वजण मनोभावे नमस्कार करतात हार-फूले वाहतात आणि देवाचा भंडारा उधळतात. देवाची ही पालखी ढोल,लेझीम,ताशा अशा वाद्यांच्या गजरात संपूर्ण गावात फिरते. त्यावेळी लहान मुलांची खूप मजा असते तेव्हा आम्ही सर्व भावंडे खेळतो आणि भंडाऱ्यामध्ये नाचतो. तसेच पालखीसोबत संपूर्ण गावात फिरतो. तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर पालखी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवली जाते. जत्रेच्यादिवशी मंदिराच्या परिसरामध्ये खूप गर्दी असते. खेळण्यांची दुकाने,मिठाईची दुकाने आणि इतर गृहपयोगी वस्तू असे सर्व काही जत्रेत विकायला असते. सर्व घरातील मोठी माणसे आम्हाला सगळ्या भावंडांना खरेदी करण्यासाठी पैसे देतात. मग आम्ही सर्व भावंडे आणि मामा-मामी,मावशी-काका या मोठ्या माणसांसोबत जत्रेमध्ये जातो.

पहिल्यांदा आम्ही सर्व मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो त्यानंतर आम्ही जत्रेत खरेदीसाठी जातो. आम्ही जत्रेत खेळणी,दागिने, लहान भावंडांसाठी फुगे आणि मिठाई खरेदी करतो. त्यानंतर आम्ही आकाश पाळण्यामध्ये खेळतो. आमच्या गावामध्ये जत्रेच्यावेळी कुस्ती स्पर्धासुद्धा असतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराजवळच कुस्ती आखाडा आहे तिथे या कुस्ती स्पर्धा असतात. आमचे गाव संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये कुस्तीगीरांसाठी प्रसिद्ध आहे.

जत्रेमध्ये नाच गाण्यांचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला असतो. त्यावेळी जत्रेत खूप गर्दी पाहायला मिळते. त्यानंतर आम्ही खूप आनंदात घरी जातो कारण आमच्या मनासारखी खरेदी झालेली असते. खरेतर जत्रेतून घरी जावेसेच वाटत नाही कारण जत्रेतील ते मस्त वातावरण शहरामध्ये अनुभवायला मिळत नाही. त्यानंतर आम्ही सर्वजण घरी अंगणात एकत्र बसून जेवण करतो आणि उशीरपर्यंत अंगणात गप्पा मारतो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पुण्याला यायचे असते. आजी-आजोबा गावाकडील जुन्या लोकांच्या गमती जमती सांगतात आणि आम्ही त्यांना शहरातील आमच्या गप्पा गोष्टी सांगतो. गप्पांमध्ये वेळ कसा जातो ते कळतच नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला येतो. गावाकडून निघताना आमचे भावंडांचे पायच निघत नाहीत पण काय करणार शाळेसाठी यावेच लागते.

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...