Skip to main content

#आभाळापर्यंत पोहच पण मातीला विसरु नको ...!..

परवा मुंबईतील एक हृद्यद्रावक बातमी टि.व्ही वर पाहीली आणि काळजात धस्स झाले. परदेशी असलेला मुलगा अनेक वर्षानंतर घरी आला. बंद असलेले घर त्याने उघडले आणि बेडवर आईच्या हाडांचा सापळा दिसला...आई चा मृत्यू भुकबळीने आणि एकटेपणाने झाला होता. त्याच आईच पत्र मुलासाठी.....!

प्रिय बाळा ,

कसा आहेस ? मला माहीत होत  एक न एक दिवस येशील तू ...मला भेटायला.... माझी विचारपुस करायला...पण एवढा उशीर लावशील अस नाही वाटलं....!

डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहत होते. श्रीरामाची वाट देखील शबरीन एवढी पाहीली नसेल....तेवढी मी तुझी वाट पाहिली ......पण माझे बाळ आलेच नाही. बाळा, माझ्या डोळ्यातील प्राण निघून गेला तुझी वाट पाहण्यात...!
तू लहान असताना माझ्या कुशीत झोपायचास....मी सांगीतलेली गोष्ट तुला खुप आवडायची. मी भरवलेला घास .....माझ्या केसांचा वास......तुझी अन माझी असलेली एकच रास.....आठवते का तुला कधी...!

तुझ्यावर खूप प्रेम आहे .....पोटात असल्यापासून तु माझ्या शरीराचा मनाचा,  हृद्याचा भाग आहेस. तुला खरचटलं तरी माझा जीव तुटायचा रे...तुला लहानपणी ताप आला तर मी रात्रभर उशाला बसायची.....तुझी शाळा....परिक्षा.....ट्रिप....सगळं सगळं मी जगले...आणि ..जागले.

आता हे सर्व सांगून मी माझ्या मातृत्वाचा हिशोब नाही मांडत फक्त मरताना या आठवणी सतत आठवायच्या त्या सांगतेय. तुला कर्तव्य म्हणून सुद्धा येता आले नाही का रे....?

बाळा तुला आता वाटत असेल कि माझा मृत्यू भुकबळीने झाला ... पण माझा मृत्यू एकटेपणाने झाला ...तुला आणि जवळच्या माणसांना भेटण्याच्या तिव्र भुकेने झाला.

मुंबई गर्दीच शहर आहे, इथे कोट्यावधी लोक राहतात पण इथे कोणालाच भेटायला वेळ नाही बोलायला वेळ नाही. ईतभर  पोटासाठी पळणारी माणस...मनाची भुक मात्र भागवत नाहीत. जिव्हाळा आणि प्रेम ...कुटूंब .संपवत आहे.
न पाहिलेल्या लोकांसाठी तासंतास मोबाईलवर असणारी माणसं आई वडिलांना एक मिनिटपण देऊ शकत नाहीत का ? जीवघेणा हा काळ माणूसपण संपवत आहे आभासी जग, जिवघेणी स्पर्धा, अफाट पैश्याचा हव्यास जिव्हाळा कुंटूब नष्ट करतो आहे का ?

तू शिकावे... मोठ व्हावे ....परदेशी जावे हे माझचं स्वप्न होत. आम्हाला मध्यमवर्गीय लोकांना जे आम्हाला नाही मिळालं ते मुलांना तरी मिळावं असे सतत वाटतं असतं....पण साता समुद्रपार तु एवढा लांब गेलास आणि आलाच नाहीस.
दिड वर्षापुर्वी मी म्हणत होती मला एकटीला नाही राहता येत बाळा, मला घेऊन जा ...तुझ्या घरी मोलकरणीसारखी राबली असते ........आणि तुझी अडचण असेल तर किमान वृद्धाश्रमात तरी ठेव..मी नाही राहू शकत मुकी होऊन...माणसं नसणाऱ्या जगात..... कशी राहू ...एकटेपणा मला खाऊन टाकेल...पण तू आईच्या या आक्रोशाला प्रतिसाद  दिलाच नाही. तू तुझा फोन बंद केला.

रोज तुला वेड्या आशेने फोन लावायची. एक दिवस तरी फोन लागेल असे वाटायचे पण फोन लागतही नव्हता आणि येतही नव्हता.

बाळा, तू माझ काळीज आहेस ....तु माझ्या हृद्याचा ठोका आहेस, पोटातल्या कुशीत लपवलेला कस्तुरी आहेस....लाखमोलाचा हिरा आहेस.

मग तु नसलास तर मी कशी जगेन......आता तू आलास ...पण मी या जगात नाही...या पडलेल्या माझ्या हाडांना कान लावून बघ ते शहारतील आनंदाने ....तु आलेला बघून...वाट पाहत होते तुझी.
काळजी करु नकोस ... प्रेम, जिव्हाळा ओलावा संपणार नाही याची काळजी घे.

मातृ देवो भव असणारी आई तुला या जगात मिळणार नाही पण माझ्यासारख्या  एकट्या बेटावर असलेल्या हजारो आयांना त्यांचे रस्ता चुकलेले लेकरु भेटू दे ..त्या बेटाचे देखील गोकूळ होऊ दे.... .हीच इश्वरचरणी शेवटची इच्छा.

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...